मुक्तपीठ टीम
शेतकरी आंदोलनाचा आज ५१ वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात आज दहाव्या फेरीची चर्चा सुरु झाली आहे. शेतकरी आणि सरकारमधील ही शेवटची बैठक असू शकते. शेतकरी नेते विज्ञान भवनात पोहोचले आहेत.
शेतकरी नेत्यांनी सरकारकडून आजही अपेक्षा असल्याचे स्पष्ट केलं. पण त्या अपेक्षा पूर्ण करणं सरकारच्या हातीच असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. आम्हाला सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत एवढेच हवे आहे. तसेच आमच्या पिकांना किमान हमी दराची कायदेशीर हमी मिळावी, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
१२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांसह कृषी कायद्याविषयी चर्चा करण्याच्या हेतूने ४ तज्ज्ञांची समिती गठीत केली होती. १४ जानेवारी रोजी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी त्यांचे नाव समितीमधून मागे घेतले.
संसदेत कृषी कायदे झाले आहेत आणि हे कायदे कोर्टाद्वारे रद्द करता येणार नाहीत, हे सरकारला माहित आहे, असेही शेतकरी नेते म्हणाले. त्यामुळे २८ डिसेंबरपासून जे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत, केंद्राने त्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणे बंद केले पाहिजे. समितीची स्थापना करणे हा यावर तोडगा नाही, असंही त्यांचे म्हणणे आहे.
कृषि कायदे मागे घेण्यासाठी काँग्रेसही आग्रही
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाशिवाय आम्हाला इतर काहीही मंजूर नाही. केंद्र सरकारला वास्तव माहित नाही.
पंजाब मंत्रिमंडळाने केंद्राकडे शेतकऱ्यांना किमान हमी दराचा घटनात्मक हक्क देण्याची मागणी केली आहे.
गुरुवारी झालेल्या पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनात झालेल्या शेतकर्यांच्या मृत्यूबद्दल दोन मिनिटे मौन पाळले गेले. या आंदोलनात आतापर्यंत सुमारे ७८ शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे.
नवीन कायदे शेती सुधारणांचा मार्ग मोकळा करतीलः
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतातील नवीन शेतकरी कायदे हे सुधारणांचा एक नवीन मार्ग आहेत असे वर्णन करत आहे. आयएमएफच्या कम्युनिकेशन्स डायरेक्टर गेरी राईस यांच्या म्हणण्यानुसार भारताचे हे नवीन कायदे शेतकर्यांना खूप उपयुक्त ठरतील. शेतकरी कोणत्याही मध्यस्थांची मदत न घेता थेट विक्रेत्यांशी संपर्क साधू शकतील. यामुळे खेड्यांची प्रगती होईल.
टिकैत अमर जवान ज्योती वर तिरंगा फडकवणार
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी गुरुवारी सांगितले होते की,’२६ जानेवारी रोजी आम्ही लाल किल्ला ते इंडिया गेट पर्यंत रैली काढणार आहोत. यानंतर सर्व शेतकरी अमर जवान ज्योतीवर जमून तेथे तिरंगा फडकवतील. ही ऐतिहासिक घटना असेल जेथे एकीकडे शेतकरी असतील तर दुसऱ्या बाजूला जवान असतील.’