मुक्तपीठ टीम
पीएम केअर फंडाच्या माध्यमातून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सच्या खराब दर्जाचा विषय आता न्यायालयानेही गंभीरतेने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणी दाखल याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि बी. यू. दबडवार यांनी स्पष्ट शब्दात केंद्र सरकारला फटकारले, “रुग्णांच्या जीवांपेक्षा हे व्हेंटिलेटर्स बनवणाऱ्या कंपनीचा बचाव करण्याची केंद्राला जास्त चिंता आहे.”
न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
• केंद्रीय आरोग्य खाते हे रुग्णांविषयी असंवेदनशील आहे.
• सरकारने रुग्णांप्रति संवेदनशीलता दाखवली पाहिजे.
• व्हेंटिलेटर सदोष आहेत असे म्हणणार्या वैद्यकीय तज्ञांच्या अहवालाचा केंद्र सरकारने विचार केला पाहिजे.
• व्हेंटिलेटरचा दर्जा सुधारण्यासाठी लक्ष दिले पाहिजे.
• व्हेंटिलेटर उत्पादक ज्योती सीएनसीपेक्षा डॉक्टरांचे ऐकले पाहिजे.
• डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले नाही असे आरोग्य खात्याच्या शपथपत्रात नमूद केल्याबद्दल न्यायमूर्तींनी फटकारले.
• केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव जी के पिल्लई यांनी शपथपत्र दाखल करताना दोषारोपण टाळत रुग्णांप्रति संवेदनशीलता दाखवणे गरजेचे होते.
केंद्राचे शपथपत्र, व्हेंटिलेटर्स ‘पीएम केअर’मधून नाही, तर ‘मेक इन इंडिया’मधून!
• पीएम केअरच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या खराब व्हेंटिलेटरप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
• या याचिकेच्या मागील सुनावणीत न्यायालयाने पीएम कॅअर फंडकडून मिळालेल्या निष्क्रिय व्हेंटिलेटरबाबत आवश्यक कारवाईबाबत केंद्र सरकारकडे विचारणा केली होती.
• त्याला उत्तर देताना सादर झालेल्या केंद्र सरकारच्या शपथपत्रात ही व्हेंटिलेटर्स पीएम केअरमधून नाही तर मेक इन इंडिया योजनेतून पुरवल्याचा दावा करण्यात आला आहे.
• गुजरातमधील ज्योती एनसी कंपनीने तयार केलेल्या व्हेंटिलेटर्सची आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचणी घेण्यात आल्याचाही दावा केंद्राने केला आहे.
• डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले नाही, असे सांगत त्यांच्यावर दोष ढकलण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
पीएम केअरमधून मिळालेले १५०पैकी ११३ व्हेंटिलेटर्स सदोष
तत्पूर्वी, महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते की, केंद्राद्वारे पीएम केअरमार्फत पाठविलेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेन्टिलेटर्स सदोष असल्याचे आढळले आहेत. या व्हेंटिलेटर्सविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून तक्रारी येत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोरोना सेंटरमधील पीएम केअरचे व्हेंटिलेटर्स बंद पडल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोपही झाला होता. अशाच तक्रारी इतर राज्यांमधूनही येत असल्याचे कळते.