मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातलं राजकारण चागलचं तापलं आहे. भाजप नेते आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्यात वाद होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींना चारवेळी पत्र लिहूनही भेटायला बोलवले नाही अशी नाराजी संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केली. तसेच वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी मी खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मोदींनी भेट न दिल्याच्या मुद्द्यावर भाजपा विरोधकांकडून भाजपावर टीका करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी भाजपाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत, असं वक्तव्य केलं आहे. केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही असंही पाटील म्हणालेत
चंद्रकांत पाटलांकडून सन्मानाची आठवण
• भाजपाच्या कार्यक्रमात खा. संभाजी छत्रपतींच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वजण उभे राहिले होते.
• एवढंच नाही तर छत्रपती शाहूच्या वंशजांना पक्ष कार्यालयात बोलावू नका, असही मोदी म्हणाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
• खासदार संभाजी छत्रपती दिल्लीत जातात तेव्हा ते ज्यांना भेटतात ते मंत्रीही आदराने उभे राहतात.
• भाजपाच्या इतरही नेत्यांनी शरद पवार यांच्या भेटीचा उल्लेख करत त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी आक्रमक
• सध्या संभाजी छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात ठिकठिकाणी दौरा करत आहेत.
• दौऱ्या दरम्याने ते विविध राजकीय नेत्यांची भेट घेत आहेत.
• मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी खासदारकीही सोडायला तयार असल्याचं, संभाजीराजे म्हणाले होते.
• तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचा चारवेळा प्रयत्न केला, पण भेट दिली नाही, हेही संभाजी छत्रपतींनी उघड केले, त्यामुळे भाजपा अडचणीत आली.
खासदार संभाजी छत्रपतींची मराठा आरक्षणावरील स्वतंत्र भूमिका भाजपाला नकोशी?
• संभाजी छत्रपतींना भाजपनं राज्यसभेवर पाठवलेलं आहे.
• संभाजी छत्रपतींचं खासदारकी सोडण्याचं वक्तव्य भाजपविरोधी म्हणून पाहिलं जातं आहे.
• तेव्हापासूनच भाजप आणि संभाजी छत्रपती यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
• खासदार संभाजी छत्रपतींची मराठा आरक्षणावरील स्वतंत्र भूमिका भाजपाला नकोशी वाटत असल्याचीही चर्चा आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटे जसे भाजपाच्या भूमिकेनुसार राज्यातील आघाडी सरकारवर टीका करत असतात, तसेच खासदार संभाजी छत्रपतींनी करावे अशी भाजपाची अपेक्षा होती. तसे न करता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचेच, या जिद्दीने संभाजी छत्रपती आक्रमक झाल्याने भाजपा त्यांच्यावर टीका करु लागली असल्याचे मानले जाते.