मुक्तपीठ टीम
माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना खुले पत्र लिहिले आहे. म्युकर मायकोसिस या आजारावरील औषधांच्या टंचाईकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. आशिष देशमुखांचे पत्र :
प्रति, दिनांक- २१.०५.२०२१
मा. श्री. राजेशजी टोपे
आरोग्य मंत्री (महाराष्ट्र राज्य)
मुंबई.
विषय:- महाराष्ट्रात म्युकर मायकोसिस महामारी घोषित करण्यात यावी तसेच त्याच्या नियंत्रणासाठी अॅक्शन प्लॅन तयार करून औषधांची होणारी काळाबाजारी बंद करण्याच्या उपाय-योजना तात्काळ अमलात आणाव्यात.
माननीय महोदय,
महाराष्ट्राची परिस्थिती कोरोना व आरोग्याच्या संदर्भात गंभीर आहे. विदर्भात वाढलेले कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा भयावह आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरत नाहीत तोच ‘म्युकर मायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराचा फैलाव संपूर्ण देशात होत आहे. या आजाराचा विळखा संपूर्ण महाराष्ट्राला पडला असून करोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचा संसर्ग वाढताना दिसत आहे. यामध्ये डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱ्या या बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका निर्माण झाला आहे. विदर्भ तसेच नागपूर शहरालासुद्धा म्युकर मायकोसिस आजाराने ग्रासले असून या आजारावरील औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. अँटिफंगस औषधांच्या मागणीत ४०० पटींनी वाढ झाली आहे.
कोरोनावर मात केलेल्या सरासरी १० टक्के रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराची गंभीर लक्षणं दिसत असल्याचं निदर्शनास आलं आहे. महाराष्ट्रात १५०० पेक्षा अधिक रुग्ण म्युकर मायकोसिसने बाधित असून ९० पेक्षा जास्त रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र तसेच ओडिशा, गुजरात, राजस्थान, पंजाब, तेलंगाना, तामिळनाडू या राज्यात म्युकर मायकोसिस ही महामारी घोषित करण्यात आली आहे. नवे येणारे रुग्ण व मृत्यूंची संख्या बघता वेळीच निदान व औषधोपचारावर भर देण्याची नितांत गरज आहे. म्युकर मायकोसिसचे रुग्ण सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळं साहजिकच या बुरशीजन्य आजाराची दाहकता कमी करण्यासाठी अॅम्फोटेरिसीन बी, फोटॉन, लिपो सोमॉल यांसारख्या अँटिफंगस औषधांची मागणी पूर्वीच्या तुलनेत ४०० पटींनी वाढली आहे. एक नवं संकट उभं राहिलं असताना आता या आजारावरील औषधांचाही अचानक मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
म्युकर मायकोसिसचा संसर्ग झालेल्या आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांना अन्य काही औषधांबरोबरच शरीराच्या अवयवांवरील बुरशीचा संसर्ग थांबविण्यासाठी इम्युनोसिन अल्फा, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवून प्राणवायूची पातळी वाढण्यासाठी दिलं जाणारं अॅक्टेम्रा या औषधाचीही मागणी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत आहेत. त्यामुळं रक्त पातळ करणाऱ्या ‘लो मॉलिक्युलर हिटरीन’ या औषधाचाही बाजारात तुटवडा भासतो आहे. मागणीच्या तुलनेत ही औषधं उपलब्ध होत नसल्यानं आता रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून जनतेच्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. एकीकडे या रुग्णांची सख्या वाढत असताना दुसरीकडे या आजारावर वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या उघडपणे कानावर येत आहेत. तसेच या औषधांची किंमत ७ हजार रुपयांच्या जवळपास असून अनेक ठिकाणी ही औषधे १० ते १५ हजारांपर्यंत विकण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा प्रशासनाने या औषधांचा साठा किती आहे, यासंदर्भातील माहिती देण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना देण्याची गरज आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये, सर्व मेडिकल डिलर्स, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे आदेश पारित करण्याची गरज आहे. तसेच खासगी वितरकांकडे उपलब्ध इंजेक्शन जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषध निरीक्षकांनी, ज्या रुग्णालयात म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, अशा रुग्णालयांना आवश्यतेनुसार तात्काळ नि:शुल्क वाटप करावे.
नागपूरमध्येसुद्धा या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच काळाबाजार रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करावा. या आजारावरील औषधे अगोदरच महागडी आहेत. त्यातच अजून काळाबाजारी करून ती औषधे आणखी अधिक दरात विकली जात आहे. यावर उपाययोजना करून सामान्य नागरिकांना कमी दरात उपचार आणि गरजूंना नि:शुल्क उपचार मिळावेत, यासाठी तात्काळ कठोर उपाय-योजना अमलात आणाव्यात.
ब्लॅक फंगस किंवा म्युकर मायकोसिस या आजारावरील अॅम्फोटेरिसीन बी हे इंजेक्शन बनवण्याची परवानगी जरी मिळाली असेल तरी पण या इंजेक्शन निर्मितीला आणखी १५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या शेकडो रुग्ण शासकीय दंत महाविद्यालयात, शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात म्युकर मायकोसिस महामारी घोषित करण्यात यावी तसेच त्याच्या नियंत्रणासाठी आपण आधीच अॅक्शन प्लॅन तयार करून औषधांची होणारी काळाबाजारी बंद करण्याच्या उपाय-योजना तात्काळ अमलात आणाव्यात, जेणे करून रुग्णांना त्रास होणार नाही, अशी आपणांस मी नम्र विनंती करीत आहे.
धन्यवाद…
आपला,
डॉ. आशिष देशमुख
माजी आमदार
नागपूर (महाराष्ट्र)