प्रा. शुद्धोधन कांबळे
गावकुसा बाहेरील लोकांचे जीवन साहित्यातून जितक्या प्रभावीपणे मांडण्यात आले आहे तितक्या प्रभावीपणे चित्रपटात अजून येणे बाकी आहे. ते सध्या मोठ्या पडद्यावर येण्याची सुरवात झाली आहे, सध्या हिंदी व प्रादेशिक चित्रपटात नविन दमाचे तरुण दिग्दर्शक समाजातील दलित समाजाचे चित्रण अत्यंत वस्तुनिष्ठ व प्रभावीपणे करीत आहेत. हिंदीमध्ये ‘आर्टिकल 15’ , मराठीमध्ये ‘फँड्री’ व तामिळमध्ये ‘पेरियमल पेरुगन’, ‘असुरण’ आणि नुकताच प्रर्दशित झालेला ‘कर्णन’ यासारख्या चित्रपटांमुळे मोठ्या पडद्यावर वंचित समाजाच्या आयुष्यातील वेदना स्पष्टपणे मांडण्याचे श्रेय नागराज मंजुळे, पा. रंजिता, वेट्रीमारन व मेरी सिल्वराज यांच्या सारख्या तरुण दिग्दर्शकांना जाते. महाभारतातील युध्द हे कौरव आणि पांडव यांच्यात लढले गेले. दोन्हीही बाजूने महारथी योध्दे होते पण शेवटी विजय पांडवांचा झाला होता. कर्ण हे एक असे पात्र आहे की, कौरवाच्या बाजूने लढूनही आपले मन जिंकते. नुकताच अभिनेता धनुषची प्रमुख भुमिका असलेला आणि मेरी सिल्वराज यांनी दिग्दर्शित केलेला ‘कर्णन’ हा तामिळ चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट तामिळनाडूमध्ये १९९५ मध्ये झालेल्या कोडीयांकुलम येथील दलित लोकांच्या वस्तीवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यावर आधारित आहे. यासंदर्भात दिग्दर्शक म्हणतात की, “सत्यघटनेपासून प्रेरणा घेऊन काल्पनिकतेच्या आधारावर चित्रपट तयार होतात.”
या चित्रपटाची पार्श्वभूमी जातीय अन्याय व अत्याचार याची आहे. सत्ते विरूद्ध संघर्ष करुन आपले हक्क प्राप्त करुन घेणाऱ्या पोडीयाकुंलम (कोडीयाकुंलमचे पोडीयांकुलम असे नाव बदलले आहे) येथील दलित समुदायाची ही कहाणी आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रवास करण्यासाठी बसस्टाॕप देखील नाही, हे लोक शेजारच्या गावातील बसस्टाॕपवर जाऊन बस पकडतात. शेजारच्या गावात बस पकडण्यासाठी गेल्यावर त्या गावातील लोकांच्या त्रासामुळे त्यांचे शिक्षण व अरोग्य यासारख्या मूलभूत गोष्टींपासून वंचित रहावे लागते. पोडीयांकुलम येथील लोक डूक्कर व कोंबडी यासारखे प्राणी पालन करुन आपली उपजीविका भागवित असतात. त्यांना गिधाडा सारख्या हिंसक प्राण्यांच्या त्रासाचा पण सामना करावा लागतो. गावाच्या सुरवातीला त्यांच्या दैवाताची मूर्ती आहे पण या मुर्तीच्या शरीरावर मुंडके नाही, यातून यासमाजाची ओळख आणि अस्तित्व किती नाममाञ आहे आणि यांच्याकडे नेतृत्व नाही हे दिग्दर्शकाने प्रतिकांच्या माध्यमातून सुंदर दाखविले आहे.
#Karnan FROM TODAY pic.twitter.com/l8h1Fj2VvI
— Dhanush (@dhanushkraja) April 9, 2021
कर्णन हा या वस्तीमध्ये राहणारा शूर तरूण आहे, त्याची लहान बहीण दवाखान्यात जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे रस्त्यावर मरते. हे दृश्य चित्रपटाच्या सुरवातीला दाखवून , या समाजातील लोकांचे मरणेही सर्वसाधारण माणसांसारखे नसून जनावरांसारखे आहे असे दाखविण्यात आले आहे. स्वत:च्या बहीणीचे असे वेदनादायक मरण कर्णनला नेहमी दुःख देत असते. अशा अनेक वेदना व अत्याचार पाहून त्याच्यातील विद्रोह जागा होतो आणि तो संघर्ष करतो. एकदा प्रवास करताना बसमध्ये त्याच्या गावातील डझनभर प्रवासी असूनही कंडक्टर त्याच्या गावात बस थांबविण्यास नकार देतो म्हणून तो धावत्या बसमधून उडी मारतो. रुग्णालयात इलाजासाठी जाणाऱ्या गर्भवती महिलेला वाहन मिळत नाही याचा राग येऊन त्या गावातील सर्व लोक एका बसची तोडफोड करतात आणि येथून त्यांचे संघटन होऊन, न्यायासाठी संघर्ष सुरु होतो. कर्णन हा त्यांचा नायक बनतो , त्याला त्याच्या वरिष्ठ मित्रा सोबत गावातील सर्व महिला व पुरुषांचा पाठिंबा मिळतो. शेवटी पोलिसांनी या समाजावर केलेला अमानुष हल्ला दाखवितांनापण अनेक प्रतिकांचा उपयोग दिग्दर्शकाने केला आहे. हा शेवटचा संघर्ष पाहताना आपण चिञपटासोबत एकरुप होऊन कर्णनची बाजू न्यायाची आहे हे आपल्याला पटते. या चित्रपटात हिंसा अधिक आहे पण ती अपरिहार्य आहे. चित्रपटाच्या सुरवातीलाच हा समाज दुर्लक्षित असून खूप दडपणामध्ये जगत आहे हे अनेक प्रतिके वापरुन दिग्दर्शकाने दाखविले आहे.अशाच प्रतिकांचा वापर विद्रोह आणि संघर्ष होताना केला आहे.
View this post on Instagram
कर्णन एका पाय बांधलेल्या खेचराला मोकळा करतो आणि ते खेचर मोकळे झाल्यावर सर्वत्र पळत सुटते, अशाच प्रकारे नायकही सर्व बंधने तोडून मुक्त होतो. संपूर्ण चित्रपटात एक लहान मुलगी देवीच्या रुपात दिसते, हे त्यांच्या पूर्वजाचे प्रतिक आहे. कर्णनचा संघर्ष पाहून ती लहान देवी खूश होते. शेवटी शरीरावर मुंडके नसलेल्या चित्राला त्या गावातील कर्णनला नेहमी पाठिंबा देणाऱ्या व शेवटी स्वताःच्या समुदायाचे रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरल्यामुळे स्वताःला जिवंत जाळून घेणाऱ्या वृध्द माणसाचा चेहरा देऊन त्यांची ओळख व नेतृत्व तयार झाल्याचे दाखविण्यात येते. हा चित्रपटातील प्रत्येक फ्रेम इतकी सुंदर आहे की, प्रत्येक दृश्य आपण वाचू शकतो.
View this post on Instagram
या चित्रपटात कौरवाकडील नावे पात्रांना देण्यात आली आहे. कर्ण, दुर्योधन , अश्वत्थामा अशी खलनायक समजली जाणारी नावे या गावातील लोकांची आहेत. पोलीस स्टेशनमध्ये या नावांमुळे त्यांना अधिक मार खावा लागतो. कर्णनच्या प्रियसीचे नाव द्रौपदी आहे, कर्णाला ज्याप्रमाणे दुर्योधनाचा पाठिंबा मिळतो त्याप्रमाणे कर्णनला त्याच्या गावातील त्याच्या वृध्द मित्राचा पाठिंबा मिळतो. एकूण चित्रपटात महाभारतातील अनेक गोष्टींचा वापर कथा सांगताना करण्यात आला आहे पण तो सर्वमान्य पध्दतीच्या विरुध्द पध्दतीने. हा चित्रपट तांकदृष्टीने उत्कृष्ट असून संतोष नारायणचे संगीत लोकसंगीतावर आधारलेले असून श्रावणीय आहे. विविध प्रतिकांचा आणि मिथकांचा वापर दिग्दर्शकाने चांगल्या पध्दतीने केला आहे. कर्णाला ज्या प्रमाणे कृष्णाकडून राजा होण्याची आॕफर मिळते त्याप्रमाणे कर्णनला पण सरकारी नौकरीची आॕफर मिळते पण तो कर्णासारखे राजा बनण्याच्या मोहाला त्यागून आपल्या लोकांना सोडून जात नाही. शेवटी त्याच्या संघर्षातून त्याच्या समाजाला सर्व सुविधा मिळून सन्मानाचे जीवन मिळते.
(प्रा. शुद्धोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत (@kamblesp13), 9421294442)