मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या ग्रामविकास प्रयोगांमुळे प्रसिद्ध असलेल्या हिरवे बाजार गावानं कोरोना संकट काळात आणखी एक आदर्श घडवला आहे. एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक असताना हिवरेबाजार गाव मात्र आज कोरोनामुक्त होत आहे. पोपटराव पवारांच्या नियोजनातून गावानं कोरोनामुक्तीचा वसा घेतला आणि आज शेवटचा रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतत आहे. अख्ख्या गावात आता कोरोनाचा एकही रुग्ण नसेल.
पोपटराव पवारांच्या प्रयत्नांमधून हिवरे बाजार गाव १९९२ पासून एका वेगळ्या वाटेवर निघाले. ही वाट होती दुष्काळाच्या शापातून मुक्त होऊन सुकाळाच्या सुराज्याची. गावात केलेल्या विविध कामांमुळे त्यांनी देशासमोर एक आदर्श ठेवला.
मात्र, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप अहमदनगर जिल्ह्यातही दिसून आला. अहमदनगरमध्ये गावागावात मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळत आहेत. हिवरे बाजारातही मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जवळपास ५२ लोकांना कोरोनाची लागण झाली. मात्र, पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने गावानं नियोजनबद्ध प्रयत्न करुन कोरोनाला आटोक्यात आणलं. त्यामुळे गावात शेवटचा एक रुग्ण कोरोनाबाधित राहिला. तोही शनिवारी घरी परतणार आहे. त्यामुळे आज १५ मे रोजी हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त होत आहे.
पोपटराव पवारांचा कोरोनामुक्तीचा ‘हिवरे बाजार पॅटर्न’
- कोरोनाबधित रुग्ण सापडल्यानंतर पोपट पवारांनी गावात चार पथके तैनात केली.
- कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल केले.
- बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले.
- डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन उपचार दिले.
- यामुळे या गावातील कोरोना संसर्गाची साखळी तुटली.
पोपटरावांनी एकप्रकारे कोरोनामुक्तीचेही एक मॉडेल देशासमोर ठेवलं आहे. गावात शिस्तीचे पालन, नियोजनबद्ध कामगिरी आणि योग्य उपचार दिल्याने गावचे गाव कोरोनामुक्त होऊ शकते हा आदर्श गाव हिवरे बाजारने देशासमोर ठेवला आहे.