मुक्तपीठ टीम
बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. अवघ्या देशभरातील भाजपाविरोधकांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाचं गुणगाण सुरु केले. त्याचवेळी एक धक्कादायक बातमी आली ती या विजयामागील रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या आवडत्या निवडणूक रणनीतीच्या कामाला रामराम ठोकण्याची. त्यांनी यापुढील काळात ते काम न करता आवडणारं दुसरं काम करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यानिमित्तानं भारतीय राजकारणात एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या कारकीर्दीचा वेध:
बंगाल निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने २००पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा दावा केला होता. मात्र, तृणमूलचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले होते की, “भाजपाने जर दोन आकडी संख्याबळ पार केले तर मी माझी कामच सोडून देईन.” एक्झिट पोल जाहीर झाले. भाजपा आणि तृणमूलमध्ये जबर रस्सीखेच दाखवली गेली. आता प्रशांत किशोर काम सोडणार का, असे डिवचणारे प्रश्न अनेक प्रसिद्ध टीव्ही पत्रकारांनी ऑन एअर विचारण्यास सुरुवात केली. पण काही वेळातच पुढच्या फेऱ्या सुरु झाल्या. भाजपाचे संख्याबळ ७७ म्हणजे दोन आकडीच राहिले. त्यापलीकडे गेले नाही. प्रशांत किशोर यांचा अंदाज खरा ठरला. तरीही त्यांनी काम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते या विजयानंतर आय-पॅक सोडू इच्छित आहेत. आता त्यांना निवडणुकीची रणनीती तयार करण्याचे काम करण्याची इच्छा नाही. आता त्यांच्या उर्वरित टीमने हे काम सांभाळावे अशी त्यांची इच्छा आहे.
प्रशांत किशोरांविषयी महत्वाची माहिती
- प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीकार आहेत.
- निवडणुका कशा लढवायच्या हे राजकीय पक्षांसाठी ठरवणे हे त्यांचे काम आहे.
- निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कोणती रणनीती स्वीकारावी, प्रसिद्धी अभियान कसे राबवावे, कोणते मुद्दे घ्यावेत हे त्यांची आय-पॅक कंपनी सुचवते. ते अंमलात आणते.
- प्रशांत म्हणतात, “पक्षाचा निवडणुकीतील विजय केवळ रणनीतीवर अवलंबून नाही. पक्षाच्या नेत्याचे कार्य आणि नाव याचा हे खूप महत्त्वाचे मानले आहे.”
- प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या माध्यमातून राजकारणातही प्रवेश केला होता. पण वाईट अनुभवांनंतर त्यांनी राजकारण सोडले. त्यामुळे ते आता त्या विचारात नाहीत.
- सध्या तरी आपण आपल्याला आवडणारे काम करु, एवढेच ते म्हणतात.
प्रशांत किशोर यांचे यशस्वी निवडणूक अंदाजांचे दशक
वर्ष: २०१२
गुजरात विधानसभा निवडणुका
- २०११ मध्ये ‘व्हायब्रंट गुजरात’ ची रचना प्रशांत किशोर यांनी डिझाइन केली होती.
- त्यानंतर २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांना भाजपाच्या प्रचाराची जबाबदारी मिळाली.
- त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी १८२ पैकी ११५ जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला.
वर्ष: २०१४
लोकसभा निवडणूक
- गुजरात निवडणुकांच्या यशानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारीही प्रशांत यांच्याकडे भाजपाने सोपविली.
- त्यानंतर बहुमतापेक्षा २८२ जागा भाजपाने जिंकल्या.
- या निवडणुकीत प्रशांत यांनी ‘चाय पर चर्चा’ आणि ‘थ्रीडी नरेंद्र मोदी’ ही संकल्पनादेखील तयार केली होती.
- तेव्हापासून प्रशांत निवडणूक रणनीतिकार म्हणून मोठे नाव आणि ब्रँड म्हणून उदयास आले.
वर्ष: २०१५
बिहार विधानसभा निवडणूक
- २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत यांनी जेडीयू, आरजेडी आणि कॉंग्रेस महागठबंधनची जबाबदारी सांभाळली.
- या निवडणुकीत जेडीयू, आरजेडी आणि कॉंग्रेसच्या महाआघाडीने २४३ पैकी १७८ जागा जिंकल्या, तर भाजपाची एनडीए ५८ जागांनी घसरली.
वर्ष: २०१७
पंजाब विधानसभा निवडणूक
- २०१७ मध्ये प्रशांत किशोर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॉंग्रेससाठी रणनीती आखली.
- काँग्रेसने ११७ पैकी ७७ जागा जिंकल्या.
वर्ष: २०१७
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक
- कॉंग्रेसने प्रशांत किशोर यांच्यावर जबाबदारी सोपवली.
- काँग्रेसला खूपच दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
- ४०३ जागांपैकी कॉंग्रेसने केवळ ४७ जागा जिंकल्या.
- या निवडणुकीत भाजपाने ३२५ जागा जिंकल्या.
वर्ष: २०१९
- आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक
- जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेससाठी निवडणूक सल्लागार
- त्यांनी वायएसआर कॉंग्रेससाठी मोहीम राबवली.
- वायएसआरने १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या.
वर्ष: २०२०
दिल्ली विधानसभा निवडणूक
- आम आदमी पक्षाचे निवडणूक रणनीतिकार
- ‘लगे रहो केजरीवाल’ अभियान सुरू केले.
- या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकल्या.
वर्ष: २०२१
बंगाल विधानसभा निवडणूक
- तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतिकार
- या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या पक्षाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी बजावली.
- २९२ पैकी २१३ जागा जिंकल्या.