मुक्तपीठ टीम
निवडणूक जाहीर झाली की सर्वत्र अब्जोपती, करोडपती उमेदवारांची चर्चा रंगते. सभागृहात किती अतिश्रीमंत आहेत त्याची मोजणी होते. निवडणुकीत फक्त तेच निवडून येतात ज्यांच्याकडे पैसे आहेत, असं सर्रास बोलले जाते. पण काही अपवादही असतात. बंगालमधील भाजपाची एक नवनिर्वाचित आमदार अशीही आहे, जिचे घर मजुरीवर चालतं. तिच्या आणि पतीच्या खात्यात आठ हजार रुपयेही नाहीत.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बांकुरा जिल्ह्यातील सालतोडा विधानसभा मतदारसंघ काहीसा वेगळा ठरला आहे. तेथून प्रथमच निवडणूक लढवून आणि जिंकून भाजपाच्या उमेदवार चंदना बाउरी विधानसभेत पोहोचल्या आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोषकुमार मंडल यांचा ४ हजारांहून जास्त मतांनी पराभूत केले. चंदना बाउरी आणि त्यांचा सालतोडा मतदारसंघ चर्चेत आला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणात त्यांचा वारंवार त्यांचा उल्लेख केल्यामुळे.
आमदार चंदना बाउरींविषयी सर्व काही…
- पती रोजंदारी मजुराचे काम करून घर चालवतात.
- घरात तीन गायी आणि तीन शेळ्याही आहेत.
- चंदनाला तीन मुले आहेत.
- भाजपा उमेदवार चंदना किंवा त्यांच्या पतीजवळ शेतीची जमीन नाही आहे.
- सलतोडा या सीटवरुन जेव्हा भाजपाने त्यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांना शेजार्यांकडून याची माहिती मिळाली.
- उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार चंदना बाउरी यांच्या स्वत: च्या बँक खात्यात केवळ ६,३३५ रुपये होते, तर पतीच्या खात्यात केवळ १५६१ रुपये होते.
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात चंदना यांनी सांगितले की, त्यांच्याकडे ३१ हजार ९८५ रुपयांची, तर पतीची ३० हजार ३११ची मालमत्ता आहे.
चंदना ही तिच्या पतीपेक्षा अधिक शिक्षित आहेत, तिचा नवरा फक्त आठवी पास आहे तर चंदना स्वत: बारावीपर्यंत शिकली आहे. पती आणि पत्नी दोघेही मनरेगा कार्डधारक आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी चंदना आणि तिच्या पतीला ६०,००० रूपयांचा पहिला हप्ता मिळाला, ज्याच्या मदतीने त्यांनी दोन खोल्यांचे पक्के घर बांधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली चंदनांची स्तुती
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अनेकदा चंदना बाउरी यांचा जाहीर उल्लेख केला होता.
- बांकुरा येथे झालेल्या निवडणूक जाहीर सभेत पंतप्रधानांनी चंदनाची तीन वेळा स्तुती केली. चंदना यांचे पती श्रबन यापूर्वी फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य होते.
- त्यांच्या आरोपांनुसार, २०११ मध्ये तृणमूल कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा छळ केला, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.