मुक्तपीठ टीम
सध्या देशात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे या पार्श्वभूमीवर नव्या कृषी कायद्याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. ॲड दीपक चटप यांनी नवे कायदे सोप्या भाषेत पुस्तकात मांडले आहे. कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात शेतकऱ्यांसाठी विशेष न्यायाधिकरण अस्तित्वात नाही. केंद्राच्या कृषी कायद्याने शेतकरी व व्यापारी यांच्यातील वाद सोडविण्याचे अधिकार प्रांतांना दिले आहे. नव्या कायद्यातील उणीवा दूर करण्यासाठी कृषी न्यायाधिकरणाची गरज अधोरेखित करणारे हे महत्वपूर्ण व दिशादर्शक पुस्तक असल्याचे मत माजी आमदार व शेतकरी नेते वामनराव चटप यांनी मांडले.
विधी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते ॲड.दीपक यादवराव चटप यांच्या ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ या चर्चीत पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राजूरा येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, सुमनताई प्रभाकर मामुलकर यांची उपस्थिती होती. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी राज्यमंत्री सदानंद खोत यांनी देखील या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.
सध्या देशात कृषी कायद्याविषयी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ॲड.दीपक चटप यांनी कायद्याविषयी सोप्या भाषेत चिकित्सा या पुस्तकात केली आहे. या कायद्याविषयी प्रकाशित होणारे हे पहिलेच पुस्तक आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रकाशसिंह पाटील यांची प्रस्तावना, प्रख्यात विधिज्ञ ॲड.असीम सरोदे व वामनराव चटप यांचे ब्लर्ब या पुस्तकाला आहे. नव्या कृषी कायद्यावरील हे पहिलेच पुस्तक आहे. कायदे पारित करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्न विचारले पाहिजे. या नव्या पुस्तकातून शेतकरी हित साधले जावे, ही अपेक्षा आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली.
कायदा हा कोरडवाहू शेती सारखा असतो त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच ओलीत होते. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विषयक कायदे खाउजा व्यवस्थेशी सुसंगत असून राज्य सरकारांनी या कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे जरुरीचे आहे. शेती व्यापाराच्या दृष्टीने स्वातंत्र्यानंतर पारित झालेले हे ऐतिहासिक कायदे आहे. आवश्यक वस्तु सुधारणा कायद्यातील उणिवा, न्याय मागण्याच्या प्रक्रियेतील दुरुस्ती आणि कायद्यात काही पळवाटा असल्या तरी संपूर्ण कायद्याला विरोध करणे चुकीचे असून रचनात्मक उपाय सुचविले पाहिजे असे मत लेखक दीपक चटप यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार आनंद चलाख तर आभार अनिल अनिल बाळसराफ यांनी मानले.