मुक्तपीठ टीम
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महाराष्ट्रात रविवारी रात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमावबंदी म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न स्वाभाविकच अनेकांना पडत आहे.
जमावबंदी म्हणजे नेमकं काय?
- जमावबंदी म्हणजे चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी.
- फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जमावबंदी लागू केली जाते.
- त्यामुळेच कलम १४४ लागू केले असे म्हटले जाते.
कलम १४४ आहे तरी काय?
- कलम १४४ हे फौजदारी दंड संहिता – १९७३ मधील कलम आहे.
- हे कलम अशा ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येनं जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची वा दंगलीची संभावना असेल, मानवी जीवाला आणि आरोग्याला धोका असेल.
- हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.
- जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.
- फौजदारी दंड संहितेच्या कलम १३४ अन्वये नोटीस पाठवून एखाद्या ठरविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध घालण्याचे निर्देश देऊ शकतात. यासाठी काही अटी आणि नियम आहेत.
- अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तींवर किंवा लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांवर सुद्धा बजावली जाऊ शकते.
- कोणत्याही भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदीचा आदेश लागू करता येत नाही.
- एखाद्या ठिकाणी दोन महिने जमावबंदी लागू केल्यानंतर ती संपुष्टात आल्यावर पुन्हा नव्याने जमावबंदीचा आदेश काढता येतो. जर राज्य सरकारला वाटले नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल असे वाटले तर ही जमावबंदी ६ महिन्यांपर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.
जमावबंदी आदेशाचा भंग केला तर कारवाई काय?
- जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अटक करू शकतात.
- कलम १०७ किंवा कलम १५१ अन्वये अटक करता येते.
- कलम १४४ नुसार वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
- हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.