मुक्तपीठ टीम
गगनयान मिशन अंतर्गत अंतराळात जाण्यासाठी निवडलेल्या चारही भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना रशियात एक वर्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आणि रशियन प्रक्षेपण सेवा ग्लॅव्ह कॉसमॉस यांच्यात अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी करार झाला होता. भारतीय अंतराळवीरांमध्ये वायुसेनेतील एका ग्रुप कॅप्टन आणि तीन विंग कमांडर यांचा समावेश आहे.
भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण १० फेब्रुवारी २०२० रोजी सुरु झाले होते. परंतु कोरोना साथीमुळे ते काही काळ थांबले होते. रशियाहून परत आल्यानंतर इस्रोने डिझाईन केलेल्या प्रशिक्षण मॉड्यूलद्वारे त्यांना पुढचे प्रशिक्षण दिले जाईल. भारतात प्रशिक्षणाचे तीन मुख्य भाग असतील. संपूर्ण प्रोजेक्टवर एक मॉड्यूल, क्रू मेंबर्ससाठी एक मॉड्यूल आणि फ्लाइट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवरील एक मॉड्यूल असेल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या चार अंतराळवीरांना गगनयानातून अंतराळात पाठविले जाईल. रशियामध्ये त्यांना अंतराळातील परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून गगनयान मिशनची घोषणा केली. या अभियानासाठी सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च केले जातील. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती. अंतराळात जाणारा पहिला अंतराळवीर, युरी गागरिन होते. त्यांनी १९६१ मध्ये अंतराळात प्रवास केला होता. देशाचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा २ एप्रिल १९८४ रोजी रशियाच्या सोयुज टी -११ मधून अंतराळात गेला. रशियाच्या व्हॅलेंटीना त्रेशकोवा यांनी १६ जून १९६३ रोजी अंतराळात प्रवास केला, जी अंतराळात गेलेली पहिली महिला होती. अवकाशात गेलेल्या पहिल्या भारतीय महिला कल्पना चावला यांना १९९७ मध्ये ही संधी मिळाली.
इस्रोचे प्रमुख के. सीवन म्हणाले की, ”२०२१ मध्ये मानसांना अंतराळात पाठवून भारत इतिहास रचेल. गगनयान मिशन ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता वाढेल. चंद्रयान -२ अभियानाने ९८ टक्के यश संपादन केले आहे.” गगनयान हे अंतराळातील भारतातील पहिले मानवनिर्मित मिशन असेल. त्यासाठी स्वदेशी रॉकेट जीएसएलव्ही मार्क -३ वापरले जाईल. भारतासाठी हा एक अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. डिसेंबर २०२१ मध्ये तिघांची टीम गगनयान प्रकल्पांतर्गत अवकाशात पाठविली जाईल. हे अंतराळवीर अंतरिक्षात विविध प्रकारच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षण चाचण्या घेतील.
पाहा व्हिडीओ: