देशभरात करोना संक्रमणाचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आलेला नसताना आता ‘बर्ड फ्लू’चं नवे संकट डोक वर काढत आहे. हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान आणि मध्य प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये ‘H5N1’ हा व्हायरस वेगाने पसरत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘H5N1’ हा मानवाला संक्रमित करणारा पहिला ‘एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस’ आहे. मात्र “आत्तापर्यंत, महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली नसल्याचे”, वरिष्ठ वनअधिकारी नितीन काकोडकर यांनी सांगितले.
एव्हीयन इन्फ्लूएन्झा नावाच्या या व्हायरसमुळे पसरणारा हा रोग इतका घातक आहे की मानवांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही मृत्युमुखी पडायला लागले आहेत. त्यामुळे या नवीन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. युरोपमधील बर्याच देशांमध्ये बर्ड फ्लू विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आपल्या देशात सरकारने अलर्ट जारी केला आहे.
बर्ड फ्लू व्हायरसचा प्राणी-पक्षांप्रमाणे मानवालाही धोका असून कोरोना विषाणूप्रमाणे मानवी श्वसन तंत्रास नुकसान पोहचवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विषाणूची लक्षणे काय आहेत? बचावासाठी काय खबरदारी घ्यावी? ह्यावर एक नजर टाकूयात..
बर्ड फ्लूची लक्षणे
• श्वासोच्छवासामध्ये अडथळे येणे
• खोकल्याची समस्या
• कफ जमा होणे
• डोकेदुखी
• मळमळणे
• तापासह शरीर आखडणे
• शारीरिक वेदना
• थोडेसे काम केल्यानंतर थकवा जाणवणे
• पोटदुखी
अशी घ्या खबरदारी
• घरामध्ये पक्षी पाळू नका.
• सद्य परिस्थितीमध्ये खुल्या बाजारात किंवा एखाद्या अस्वच्छ ठिकाणांहून मांस खरेदी करू नका.
• संसर्गापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक.
• पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळा.
• बर्ड फ्लू व्हायरची लक्षणे आढळून आल्यास ४८ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घ्या आणि योग्य ते औषधोपचार करा.