मुक्तपीठ टीम
मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान नेहमीप्रमाणे नवीन महिना सुरू होताच काही छोटे-मोठे बदल पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या १ जूनपासून कोण-कोणते बदल होणार हे जाणून घेऊया. कारण याचे थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. १ जूनपासून बँकिंग नियमांपासून ते सोने खरेदीपर्यंतचे नियम बदलणार आहेत.
एसबीआय गृहकर्ज
- स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ निर्णय घेतला आहे.
- हा व्याजदर ४० बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढवून ७.०५ टक्के केला आहे.
- एसबीआयच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, हे वाढलेले व्याजदर १ जूनपासून लागू होतील.
- यापूर्वी हा व्याजदर ६.६५ टक्के होता.
वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार…
१ जूनपासून वाहनांचा थर्ड पार्टी विमा महाग होणार आहे. हे वाढलेले दर केवळ चारचाकी वाहनांच्याच नव्हे तर दुचाकी वाहनांच्या मालकांनाही लागू होतील. केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियम दरात वाढ केली.
इंजिन क्षमतेच्या बाबतीत प्रीमियम
- केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता कारच्या इंजिननुसार विमा काढण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.
- रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये यापूर्वी २०१९-२० या वर्षासाठी वाढ करण्यात आली होती.
- आता १ हजार सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांना थर्ड पार्टी विम्यासाठी २ हजार ९४ रुपये निश्चित प्रीमियम भरावा लागेल, जो २०१९-२० मध्ये २ हजार ७२ रुपये होता.
- याशिवाय १ हजार सीसी ते दीड हजार सीसी कारसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियम ३ हजार २२१ रुपयांवरून ३ हजार ४१६ रुपये करण्यात आला आहे.
- दीड हजार सीसी वरील वाहनांच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये ७ हजार ८९० रुपयांवरून ७ हजार ८९७ रुपयांपर्यंत किरकोळ वाढ करण्यात आली आहे.
हा प्रीमियम दुचाकी वाहनांसाठी निश्चित करण्यात आलाय…
- केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार केवळ चारचाकी वाहनांसाठीच नाही तर दुचाकींसाठीही सरकारने थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमच्या दरात बदल केला आहे.
- १ जून पासून, दीडशे सीसी ते ३५० सीसी पर्यंतच्या बाइक्ससाठी प्रीमियम १ हजार ३६६ रुपये आकारला जाईल, तर ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठी विमा प्रीमियम २ हजार ८०४ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
अॅक्सिस बँक
- १ जूनपासून अॅक्सिस बँक मोठा बदल करणार आहे.
- खात्यामध्ये निम-शहरी आणि ग्रामीण भागात वेतन खात्यांमध्ये सरासरी मासिक बॅलन्स लिमिट पंधरा हजार रुपयांवरून २५ हजार रुपये किंवा १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
गोल्ड हॉलमार्क
- सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा २०२२ मध्ये १ जूनपासून सुरू होणार आहे.
- यानुसार २०,२३ आणि २४ कॅरेटच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सुरु केले जाणार आहे.
- या मोहिमेत आता ३२ नवीन जिल्हे वाढणार आहेत.
- या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क केंद्र स्थापन केले जाणार आहे.
- २३ जूनला पहिल्या टप्प्यात २५६ जिल्ह्यांत ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने म्हटले आहे की आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) साठी जारीकर्ता शुल्क लागू करण्यात आले आहे.
- हे शुल्क १५ जून पासून लागू होणार आहे.
- नियमांनुसार, दर महिन्याला पहिले तीन AEPS व्यवहार विनामूल्य असतील, ज्यात AEPS रोख पैसे काढणे, AEPS रोख ठेव आणि AEPS मिनी स्टेटमेंट यांचा समावेश आहे.
- विनामूल्य व्यवहारांनंतर, प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा रोख ठेवीवर २० रुपये अधिक GST लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर ५ रुपये अधिक GST लागू होईल.