मुक्तपीठ टीम
लसीकरणामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झालेला असला तरी विषाणू संसर्ग संपलेला नाही. जेथेही संधी मिळते तेथे हा जीवघेणा विषाणू डोकं वर काढताना दिसतो. मुंबईच्या भायखळा तुरूंगात सहा मुलांसह ३९ महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या नऊ-दहा दिवसात ३९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाबाधीत रूग्णांना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे. तेथिल अधिकाऱ्यांच्या मते एकूण १२० कर्मचारी आणि कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
बृहमुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधीत ३९ पैकी ३६ रूग्णांना पाटणवाला शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या रूग्णांमध्ये एका गरोदर स्त्रीचा समावेश होता. त्या महिलेला ताबडतोब जी.टी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अद्यापिही या तुरुंगाला कन्टेंटमेंट झोन जाहीर करण्यात आलेले नाही.