मुक्तपीठ टीम
सन १९७१ च्या युद्धात आम्हाला पाकिस्तान नौदलाच्या नौकांवर रात्री हल्ला करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. कोणावर हल्ला करायचा , कुठे जायचे आहे याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. मी त्यावेळी आयएनएस निर्घाट या नौकेवर लेफ्टनंट कमांडर होतो. मात्र शत्रुच्या कोणत्या नौकेवर हल्ला करायचा याची काहीच माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली नव्हती, असे भारतीय नौदलातील तत्कालिन ले. कमांडर आय. जे. शर्मा यांनी मुक्तपीठला सांगितले.
हल्ल्याचा प्लॅन फत्ते करायचाच, एवढेच सांगण्यात आले होते. त्यावेळीही ते प सिक्रेट मिशन होते. आम्हाला एक लिफाफा देऊन तो लगेच उघडायचा नाही, हे आदेश दिले होते. कराचीजवळ पोहचल्यानंतरच एन्व्हलप उघडा, असेही ताकीद देऊन सांगण्यात आले. त्याचे मी पालन केले. कराचीजवळ गेल्यानंतर पाकीट उघडल्यानंतर कराचीवर हल्ला करण्याचे आदेश त्यात लिहीले होते. त्यावेळी तेथे आयएनएस वीर आणि आयएनएस निपत या क्षेपणास्त्र नौका आल्या होत्या. त्यानंतर आणखी दोन नौैका आल्यानंतर एकूण ४ नौकांची मिट्ट काळोखात समुद्रात मार्गक्रमणा सुरु होती.
स्क्वॉड्रन कमांडर बबलू यादव आमचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या सुचनेनुसार या लढाऊ नौकांचे फॉर्मेशन करण्यात आले. त्याचा आकार त्रिशुळासारखा झाला होता. पुढे एक नौका आणि मागून येणा-या दोन नौकांमुळे त्याला त्रिडेंट असे संबोधले जाते.
आमच्या मागून वरिष्ठ अधिका-यांची नौका येत असताना, १९ समुद्र मैल (नॉटिकल माईल्स) अंतरावर शत्रुंच्या नौका निदर्शनास आल्यानंतर, मी माझ्या वरिष्ठ अधिका-यांना ह्यत्यांच्या नौकेवर जोरदार हल्ला करु का, याची परवानगी घेतली. त्यांनी तात्काळ संमती दिली. शत्रुच्या नौकेवर क्षेपणास्त्र डागले. ते अचूक लागले. मी पुन्हा वरिष्ठांना आणखी एक क्षेपणास्त्र डागण्याची परवानगी मागितली. ह्यशत्रुच्या नौकेजवळ जाऊन हल्ला केला. तोदेखील अचूक दणका लागला. माझ्या नजरेसमोर शत्रुच्या नौकेचे अक्षरश: दोन तुकडे झाले आणि ती नौका विशाल समुद्रात बुडायला लागली होती.
त्यावेळी जी.एस. भाटी हे रडार आॅपरेटर होते. ते शत्रुच्या नौकेचा माग काढत होते परंतू त्यांचे हात थरथरत होते. मी त्याला तेथून उठवले आणि आमच्या एक्झीक्युकेटिव्ह आॅफिसरनी (एक्स ओ) मला त्यांच्या जागेवर बसवून मी क्षेपणास्त्र डागले. नंतर काहीवेळांनी तुझे हात का कापत होते, असे भाटी यांना विचारले असता, त्यांनी मला सांगितले की, ह्य हल्ल्यानंतर नौका नक्कीच वाचणार नाही, मात्र शत्रुच्या नौकेत असलेल्या सैनिकांचे काय होईल, त्यांच्या कुटुंबियांचेही पुढे काय होईल, हा प्रश्न मला छळत होता. त्यामुळे माझे हात थरथरत होते. हे ऐकून मी त्याला सांगितले की, अरे, त्यांनी आपल्यावर हल्ला केला असता तर आपल्या कुटुंंबाचे काय झाले असते, आपण कुठे गेलो असतो, याचाही विचार तु करायला हवा होतास…हे मी त्याला ऐकवले. ही घटना शर्मा यांनी मुक्तपीठला सांगितली , त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर तो प्रसंग तरळला होता. ते नौदलातून कमोडोरया उच्च पदावरुन निवृत्त झाले आहेत.