Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home सरळस्पष्ट

सुशांतचा तपास, सर्वच नापास !

December 22, 2020
in सरळस्पष्ट
0
सुशांतचा तपास, सर्वच नापास !

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरण. खरंतर एका उमद्या अभिनेत्यानं आत्महत्या केल्यानं शोकांतिकेचंच. पण पुढे त्या प्रकरणात वेगवेगळे रंग मिसळण्याचे प्रयत्न झाले. आत्महत्या नसून हत्येचा आरोप झाला. शोकांतिका गूढपटात बदलताना दिसली. पुढे काहीसा सूडपटाचाही रंग वाढू लागला. पण आता दिल्लीतील ऑल इंडिया मेडिकल इंस्टिट्यूटच्या तज्ज्ञ पथकाने आणि त्यानंतर क्राइम रिक्रिएटचे अनुभव मांडत सीबीआयनेही आत्महत्येवरच शिक्कामोर्तब केल्यानं पुन्हा मूळ कथानकावरच परतावे लागत आहे. कदाचित मूळ पटकथाच चालवणं फायद्याचं असल्याचं सूत्रधारांच्या लक्षात आलं असावं. बॉलिवूडमधील एका आत्महत्या शोकांतिकेला हत्येच्या गूढपटात बदलून पुढे सूडपट प्रत्यक्षात आणण्याचा काहींचा प्रयत्न असल्याची चर्चा जोरात सुरु होती. आता ती आत्महत्याच असल्याचं तज्ज्ञांनीच सांगितल्याने अनेक उघडे पडले आहेत. मात्र, तरीही केवळ सुशांत प्रकरणी वेगवेगळे आरोप करणारेच नाही तर ज्यांच्यावर आरोप झाले तेही उघडे पडलेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळेच सुशांतचा तपास आणि सर्वच नापास असाच एक वास्तवदर्शी चित्रपट यातून साकारतोय. कसं ते पाहूया.

सुशांतच्या आत्महत्येनंतर काही दिवसातच सुशांतचा बळी बॉलिवूडमधील घराणेशाहीनं घेतल्याची कुजबूज सुरु झाली. ती सोशल मीडियावर पद्धतशीरपणे सुनियोजित हॅशटॅग ट्रेंड चालवून पुढे वाढवण्यात आली. माणूस हा भावनाशील असतो. त्यात जेव्हा सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड हे बोट अकाऊंट्सच्या फुगवट्यातून उफाळवले गेलेत, याची माहिती नसते, तेव्हा स्वाभाविकच तो अशा ट्रेंडच्या लाटेला महालाटेत बदलण्याचं एक साधन ठरू लागतो. भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. आधी करण जोहर वगैरेंचा तडका दिला गेला. ते तेवढं चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानी तडका देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापू लागलं. पण अचानक ते सारंच थंडावलं. काहींचं म्हणणं असं आहे की, ज्यांच्यावर आरोप झाले त्यांचेच पंतप्रधान मोदींसोबतचे सेल्फी असल्याचं व्हायरल होऊ लागल्यानं ते रंग वगळले गेले.

तेवढ्यात मुंबईतील प्रकरणात बिहारी रंग मिसळण्यास सुरुवात झाली. सुशांतच्या कुटुंबीयांनी तिथं आत्महत्या नसून हत्येचा आरोप करणारा गुन्हा दाखल केला. बिहार पोलिसांनी तपास सुरु केला. पुढे सर्वोच्च न्यायालयात तपासाचा हक्क कुणाचा, असा वाद रंगला, त्यातून सीबीआयकडे तपास गेला. सीबीआयचं पथक मुंबईत आलं. त्यांनी २४ जणांकडे चौकशी केली. त्यात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, रियाचे आई-वडिल, सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबिय, सुशांतसाठी काम करणारे कर्मचारी, त्यांच्यावर मानसोपचार करणारे डॉक्टर, सीए आणि काही मित्र यांचा समावेश होता.

सीबीआयने मुंबईतील कुपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल, इतर पुरावे दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांकडे सोपवले. त्यांनी सखोल चौकशी करुन अहवाल सादर केला. त्यात सुशांतला विष दिल्याचे पुरावे नसल्याचे स्पष्ट झाले. तसंच सुशांतच्या मृतदेहाच्या छायाचित्रांच्या, अन्य पुराव्याच्या आधारे त्याच्या शरीरावर अन्य कुठेही कसल्याही खुणा, जखमा नसल्याचे दिसून आले. गळ्यावरील खुणा गळफासाच्या होत्या. डॉ. सुधीर गुप्ता यांनी आपल्या अहवालात स्पष्ट म्हटले, की सुशांत प्रकरण हत्येचे नसून आत्महत्येचं  आहे.

सीबीआय अनेकदा नेमकं काय घडलं असेल ते समजून घेण्यासाठी जिथं गुन्हा घडला तिथंच, ज्या पद्धतीनं गुन्हा घडला असेल त्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी तसंच नाट्यमय रुपांतर करून पाहते. त्याला क्राइम सीन रिक्रिएट म्हणतात. त्यातही सुशांतनं आत्महत्या केलेल्या खोलीत कुणी जबरदस्तीनं प्रवेश केल्याचं आढळलं नाही. तसंच सुशांतच्या मृतदेहावर इतर खुणा नसल्यानं कुणाशी त्याची झटापट झाली नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे सीबीआयनेही आत्महत्येचाच निष्कर्ष काढला.

हा सर्व घटनाक्रम यासाठी मांडला कारण आजच्या दिवसात आपण कालचं विसरून जातो. आपली स्मृती ही तशी कमजोरच असते. अनेकदा काही सूत्रधार याचाच गैरफायदा घेतात. त्यामुळेच ही उजळणी. आता सुशांत प्रकरणात सर्वच कसे नापास ते पाहूया.

सुरुवात ट्रेंडवीरांकडून त्यांनी आधी बॉलिवूड घराणेशाहीच्या नावानं शंखनाद केला. खानदान काढलं. नंतर अचानक ते विसरवून फक्त रिया चक्रवर्तीला लक्ष्य केलं गेलं. आता काहींना वाटेल, गैर काय? ती ड्रग प्रकरणात आरोपी झालीच ना. पण मुळात आरोप काही ड्रगचे नव्हते. हत्येचे होते. उलट जे काही बाहेर आलं त्यातून उमदा गुणवंत अभिनेता हा स्वत:च अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचं सातत्यानं बाहेर येत राहिलं आणि त्याचीच मरणोत्तर लक्तरे बॉलिवूडच्या वेशीवर टांगली गेली.

त्यानंतर बिहार पोलीस. त्यांनी केवळ राजकीय मालकांना खूश करण्यासाठी दुसऱ्या राज्यात घडलेल्या प्रकरणाचा आपल्या राज्यात गुन्हा दाखल केला. त्याचा घिसाडघाईनं तपासाचा आव आणला. जरी सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे तपास दिला असला. तरी त्याची पार्श्वभूमी बिहार पोलिसांच्या टोकाच्या दाव्यांची होती, हे विसरता येत नाही. त्यातच बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे. हे महाशय तर भाषणंच देत असत. पुढे निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी राजीनामा देऊन आपल्यातील राजकीय महत्वकांक्षा उघड केलीच. पण बिहार सरकार आणि पोलिसांनी एक गंभीर पायंडा पाडलाय. भविष्यात बिहारमध्ये किंवा दुसऱ्या राज्यात काही राजकीय किंवा अन्य हिशेब चुकते करण्यासाठी दुसऱ्या राज्यांचे राजकारणी, हितसंबधित, पोलीस त्या राज्यांमध्ये घडलेल्या घटने प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करतील. खरंतर हद्दीबाहेरच्या गुन्ह्याची दखल घेतली पाहिजे, पण त्यासाठी झीरो एफआयआर दाखल करून संबंधित पोलिसांकडे वर्ग करायचा असतो. तसं झालं नाही. भविष्यात हा पायंडा पडू नये. यातून संघराज्य भावनेलाही धक्का पोहचू शकतो.

केंद्रातील भाजप सरकारकडून याप्रकरणी जो उत्साह दाखवला गेला त्यात राज्यातील मनाविरुद्धच्या आघाडीत बिघाडी घडवण्याचा राजकीय हेतू स्पष्ट दिसत होता. त्यातून वाट्टेल ते राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु होतेच. पण वातावरण नको तेवढं कलुषितही झालं. आता सीबीआयचा तपास प्रामाणिक असेलही, पण त्याचे निष्कर्ष देवेंद्र फडणवीस – संजय राऊत यांच्या ‘जाहीर’ गोपनीय भेटीनंतर बाहेर आल्यानं कुणाच्या मनात भलताच संशय निर्माण झाला तर चूक कुणाची?

खरंतर सीबीआयने आता आत्महत्या म्हटलं. म्हणजे प्रामाणिक तपास केला, मग ते कसे नापास, असं वाटू शकतं. पण तपास सुरु असताना प्रसार माध्यमं, समाज माध्यमं यांच्यात जी वाट्टेल ती पतंगबाजी सुरु होती ती सीबीआयच्याच हवाल्यानं. त्यावेळी अपवाद वगळता कधीही तसं नसल्याचं स्पष्ट केले गेले नाही.

माध्यमांनी तर आपलं सर्वात जास्त हसं करून घेतलं. आधीच माध्यमांची सूत्रं सध्या जाहीर थट्टेचा विषय झालीत. विखारी अपप्रचाराचा मांजा वापरत केलेल्या पतंगबाजीत एखाद्या टीव्ही चॅनलने जर पीएचडी केली असेल तर इतर किमान डबल ग्रॅज्युएशनपर्यंत तरी होतेच होते. मराठी माध्यमांचीही वाईटच वाटावी अशी स्थिती होती. आजवर प्रतिस्पर्धी चॅनलवर चालणाऱ्या ब्रेकिंग व्याकरणाच्या चुकांसह चालण्याची उदाहरणे पाहिली होती. यावेळी तर सरळ सरळ आपला अजेंडाच दिल्लीला आऊटसोर्स केल्यानं जास्तच खुपलं. हिंदी-इंग्रजीत चाललेली बातमी ही जोपर्यंत आपला रिपोर्टर कन्फर्म करत नाही तोपर्यंत ती फक्त माहितीच मानावी. बातमी म्हणून चालवू नये हे भानच स्पर्धेपोटी सुटले असावे. अर्थात त्याला मराठी प्रेक्षकांची मानसिकता आणि त्यातून उद्भवणारी स्पर्धाही जबाबदार असावी. त्यावर पुन्हा कधीतरी.

आता काहींना वाटू शकतं, मुंबई पोलिसांनी जे सातत्यानं सांगितले तेच जर खरं ठरले तर सुशांतच्या तपासात नापास ठरलेल्यांमध्ये ते नसावेत. राज्यातील आघाडी सरकार नसावेच नसावे. तसं करणं हे अंधभक्तीसारखेच अंधभाट झाल्यासारखे होईल. मुंबई पोलिसांचंही चुकलंच. सुशांत प्रकरणाची गंभीरता. त्याला मिळत असलेली वळणे. त्यांनी गंभीरतेने घेतलीच नाहीत. तपासात मिळालेली माहिती, शवविच्छेदन अहवालातील मुद्दे त्यांनी गदारोळ सुरु होण्यापूर्वीच माध्यमांमधून लोकांसमोर मांडले असते तर संशयकल्लोळाचा राजकीय प्रयोग झाला नसता, झाला असता तरी एवढा रंगला नसता.

राज्यातील आघाडीचे नेते तर सपशेल अपयशी ठरले. भाजप विरोधात आहे. वाट्टेल ते डावपेच खेळणारच. राजकारणच आहे. होत राहणारच. पण गृहखात्याकडून योग्य हाताळणी दिसली नाही. कदाचित ज्यांच्यावर विश्वास टाकून जबाबदारी दिली ते पोलीस अधिकारी योग्य ब्रिफिंग देत नसावेत. तरीही तो दोषच. कधी विनाकारण आदित्य ठाकरेंचे निवेदन तर कधी संजय राऊतांसारख्यांकडून केली जाणारी वक्तव्ये यामुळे शिवसेनेकडून हे प्रकरण शमवण्याऐवजी उफाळण्यातच रस होता की काय असं वाटत होतं.

वाईट वाटलं ते आपल्या मुंबईतील कूपर रुग्णालयातील त्या डॉक्टरांचे. त्यांनी प्रामाणिकपणे व्यावसायिक कर्तव्य पार पाडले होते. पण त्यांची नाहक बदनामी झाली. काही काळ ते. त्यांचे कुटुंबीय भलत्याच मानसिक छळ सोसत असावेत.

हे झालं इतर सर्वांचं. सामान्यांचं काय? राजकारणी राजकीय डाव खेळतात, माध्यमं त्यांचे अजेंडे चालवतात, पण तुम्ही? तुमच्या पायाखाली काय जळतंय, रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून या भ्रमजालात तुम्ही का अडकता? वास्तवापासून दूर नेत भ्रामक विश्वात नेणारं ड्रगचं व्यसन आणखी काय करतं? आपणच ठरवायचंय!

–    तुळशीदास भोईटे,
–    ९८३३७९४९६१


Tags: Succied Casesushant singh rajput
Previous Post

32 हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा खरा अजेंडा !

Next Post

काळ बदलतोय…माध्यमांची कायाही बदलणारच…आत्मा हरवू नये!

Next Post
काळ बदलतोय…माध्यमांची कायाही बदलणारच…आत्मा हरवू नये!

काळ बदलतोय...माध्यमांची कायाही बदलणारच...आत्मा हरवू नये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!