Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home प्रेरणा

‘तबेल्या’ची शाळा करणाऱ्या माई…सरोज पाटील मॅडम !

January 5, 2021
in प्रेरणा
0
saroj patil

मुंबईसारखं महानगर. विलेपार्ले हे सांस्कृतिक शैक्षणिक राजधानी म्हणावं असं उपनगर. तिथं पार्ले टिळकसारख्या नामांकित शैक्षणिक संस्था. तिथंच पार्ले टिळकपासूनच काही अंतरावर एक शाळा मात्र काहीशी अंग चोरून वसलेली. माध्यमिक शाळा. ८ वी ते १० वी. शाळा पार्ल्यातील, मात्र शैक्षणिकदृष्ट्या एखाद्या खेडेगावातीलही बरी वाटावी अशी सुमार. इमारतही बैठी चाळीसारखीच वाटणारी. सुविधा नसलेली. ‘तबेला’ म्हणायचे अनेक लोक. माई म्हणजेच सरोज पाटील मॅडमनी ‘तबेला’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या शाळेला शाळेसारखं बनवलं. शाळेचं नाव अभिमानानं घेतलं जाऊ लागलं. छत्रपती शिवाजी विद्यालय, विलेपार्ले, मुंबई !

आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं सध्या कोल्हापुरात असणाऱ्या सरोज पाटील मॅडमशी बोललो. त्यांच्याशी बोलताना ऐकलेला आणि अनुभवलेला इतिहास नजरेसमोर तरळला.

पाटील मॅडममुळेच शाळा सुधारली, निकाल सुधारला आणि त्या शाळेत शिकणाऱ्या माझ्यासारख्या हजारोंचं जीवनही घडवलं गेलं. होय, मलाही घडवणारी हीच शाळा !! पण मी तसा सुदैवी, कारण मी १९८२मध्ये शाळेत गेलो, तोपर्यंत पाटील मॅडमनी शाळेत चांगले बदल घडवून आणले होते. पण काही वर्षे मागे गेलं तर खूप भलतीच स्थिती होती. आज पाटील मॅडमशी बोलताना अनेकांकडून ऐकलेला शाळेचा तो इतिहास आठवला.

आमचं छत्रपती शिवाजी विद्यालय विलेपार्ल्यात. पण शाळेत विलेपार्ले नव्हतं. कारण तिथं येणारा वर्ग हा समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सर्वात तळागाळात असणारा. अनेकांची तर शिकणारी पहिली किंवा दुसरीच पिढी. पार्ल्यापेक्षा शेजारच्या अंधेरी, सहार, सांताक्रुझ या उपनगरांमधील चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील कष्टकरी कुटुंबातील मुलं-मुली कुठंच प्रवेश मिळत नाही म्हणून त्या शाळेत येत.

मी मनपा शाळेत शिकलेलो. शैक्षणिक कामगिरी तशी बरीच. पण का कोणास ठाऊक आईनं अंधेरीतील जवळच्या शाळा न निवडता तशी दूरची पार्ल्यातील शाळा निवडली. बहुधा तीही कामगार असल्यानं इतर कामगारांकडून पाटील मॅडम, इतर शिक्षक वर्गाविषयी ऐकलं असावं. त्यामुळे एक चांगलं झालं. चालण्याची मस्त सवय लागलीच आणि जीवनाला दिशाही मिळाली.

जुन्या काहींशी बोलल्यावर कळतं शाळा मी प्रवेश घेतला तेव्हा जशी बदलली होती, बदलत होती तशी पूर्वी नव्हती. १९६५मध्ये पाटील मॅडम आल्या. सुरुवातीला शिक्षिका. पगाराच्याही बोंबा. कसंबसं चालायचं. पुढे कायम झाल्या, पण पगार तसा हाती येतच नव्हता. चेकनं पगार सुरु झाला आणि त्यांच्यासारख्या शिक्षकांना दिलासा मिळाला.

शाळेत येणारे विद्यार्थी चाळी, झोपडपट्ट्यांमधील. असं म्हणतात की त्याकाळी काही मुलं चाकू सुरेही आणायचे. त्यामुळे शिक्षकांनी शिस्त लावण्यासाठी शिक्षा करणं दूरच, तेच टरकून असायचे. शिक्षकांनी नोकरी सोडण्याचे प्रमाण जास्त असायचं. क्वचितच कुणी टिकायचं. पाटील मॅडमसाठी मात्र शाळा अशी असणं हेच समर्पितपणे काम करण्याची संधी असावी. त्याचं कारण त्यांची सामाजिक बांधिलकीची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यातूनच घडलेला स्वभाव असावा. त्या टिकून राहिल्या. परिस्थिती बदलण्यासाठी झगडत राहिल्या. त्यांना मुख्याध्यापिकापदाची जबाबदारी मिळाली ती ‘ओसाडगावच्या पाटीलकी’सारखीच. पण त्यांनी ओसाडगावातच शिक्षणाचं नंदनवन फुलवलं. आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षणच नाही तर शिस्त आणि संस्कारही मिळू लागले.

छत्रपती शिवाजी विद्यालयातील शैक्षणिक आणि इतर संस्कारांमुळे माझं तर जीवनच बदलून गेलं. आईची शाळेची निवड सार्थ ठरली.

शिवीगाळ, रासवट वागणं चहूबाजूला असणाऱ्या वस्त्यांमधील आम्ही मुलं छत्रपती शिवाजी विद्यालयात घडवले गेलो. मला तसं वाचनाचं वेड बालपणापासूनच. पण छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रत्येक वर्गात पुस्तकांची पेटी येत असे. त्यातील पुस्तकांनी वाचन वेडाला आकार दिला.

पत्रकार झालो ते वाचनाच्या वेडातून. त्या वेडाला आकार दिला तो शाळेतील त्या पुस्तक पेटीनं. तसंच लोकांसमोर, कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा आत्मविश्वास जोपासला तोही शाळेतील दर एक ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेतून. विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग कष्टकरी. कमीच भाग घ्यायचे. पण शिक्षकांच्या खोलीतील माइकसमोर उभं राहून बोलताना शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आपलं बोलणं ऐकत आहेत ही जाणीव माझा आत्मविश्वास वाढवत गेली. मी तसाही घडलो.

संस्थेतील प्रतिकुलतेशी लढतानाच पाटीलबाईंच्या सामाजिक जाणीव खूपच तीव्र होत्या. मला आठवतं मी आठवीला होतो. माझ्या सोबतची गिरणीकामगारांची मुलं असणारे मित्र रुबाबात राहायचे. पण तो गिरणी संप झाला. आणि चित्रच बदलले. खरंतर शाळेनं काय करावं? पण माझी शाळा पाटील मॅडमची शाळा होती. त्यांनी शिक्षकांच्या माध्यमातून आम्हा मुलांना विश्वासात घेतलं. कामगिरी दिली. संपानं पोळत असलेल्या गिरणी कामगारांच्या मुलांसाठी समाजातून सहकार्य मिळवण्याची. मला आठवतं. मी रिकाम्या वेळेत अनेक घरं फिरलो. खूप पुस्तकं गोळा झाली. शाळेत तो गठ्ठा नेताना ओझं जाणवलं नव्हतं, उलट आपण काहीतरी करु शकल्याच्या अभिमानानं त्या वयात छाती तट्ट फुगली होती.

मला आठवतं. अगदी आजही लक्षात आहेत आमच्या समूहगीत तासातील गाणी. खरा तो एकची धर्म…पासून अनेक. त्यातही ग. दि. मांडगुळकरांचं…हे राष्ट्र देवतांचे…हे राष्ट्र प्रेषितांचे…हे गाणं आजही मनात निनादत असतं.

“कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची”

हे कर्तव्यदक्षतेचे पाठ आपल्या वागण्यातून आमचा शिक्षकवर्ग आम्हाला रोजच शिकवायचा.

पाटीलबाईंनी फार आर्थिक बळ नसताना, काही प्रस्थापितांचा साधा खिळाही ठोकण्यास विरोध असतानाही शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामांबरोबरच शिक्षकांच्या मदतीनं शिक्षणाचा दर्जाही असा दुरुस्त केला की इमारत बैठी असली तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाचे मात्र मनोरे उभे राहिले. जणू त्यांच्या रचनात्मक संघर्षातून त्या आम्हाला दाखवून देत असत…

“येथे नको निराशा, थोडया पराभवाने

पार्थास बोध केला येथेच माधवाने”

माझ्यासारख्यांवर पद, सत्ता हाती असतानाही जमिनीवरच राहण्याचे संस्कारही झाले ते पाटील मॅडममुळेच. काहीवेळा चांगला पगार, सोयीसुविधा, मोठं पद असलेली नोकरी सोडून वेगळा प्रयत्न करण्याचं बळही आईच्या संस्कारांप्रमाणेच शाळेतील मॅडमचं वागणं पाहूनही मिळालं असावं. मॅडम महाराष्ट्रातील महानेत्याच्या कुटुंबातील. मात्र, मला आजही आठवतात…स्कुटरवरून येणाऱ्या, अनेकदा स्कुटर स्टार्ट करण्यासाठी किकवर किक मारणाऱ्या आमच्या पाटीलबाई. कडक शिस्तीच्या पण मायाळू स्वभावाच्या. माती आणि माणसांशी नातं राखणाऱ्या. बहुधा त्या माई म्हणून ओळखल्या जातात, त्यामागे थोरल्या बहिणीची करडी शिस्त आणि माया करणारा स्वभावही असावा.

पाटील मॅडम म्हणतात, “प्रत्येक मुलं हे बुद्धिमत्तेचं लेणं असतंच असतं. शिक्षकांनी शोधून आकार दिला पाहिजे. टाकाऊ काहीच नसतं, तसं वाटलं तरी त्यातूनच टिकाऊ घडवलंच पाहिजे.”

घडलं तसंच. शाळेतून डॉक्टर – इंजिनीअर कमी झाले असतील. पण हजारो लघु उद्योजक घडलेत. शाळेच्या संस्कार, शिस्तीतून नेतृत्वगुण वाढवले गेले. छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकलेल्यांमधून दहा नगरसेवक, दोन आमदार आजवर निवडले गेलेत.

सरकारी योजना आता खूप आहेत. पण आमच्या शाळेत येणारी मुलं ही खूपच गरीब परिस्थितीतील. मुलींचे तर खूपच हाल. पाटील मॅडमनी एक योजना राबवली. विलेपार्ल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबांशी संवाद साधला. त्यांना सहकार्यासाठी पुढे आणलं. त्या कुटुंबांनी मुलींना शैक्षणिक दत्तक घेतलं . त्या योजनेतून २५० मुली व्यवस्थित शिकू शकल्या.

मॅडम आणखी एक सांगतात. नव्हे तीव्रतेनं बजावतात. “कधीच नकारघंटा वाजवू नका. प्रयत्न करा. शिक्षकांनी ठरवलं तर खूप करू शकतात. तुम्ही चांगलं काम केलंत तर समाज सोबत येतो.”

मॅडम जे बोलतात, त्यांनी करूनही दाखवलं. करूनही दाखवत आहेत. आमच्या शाळेला सभागृह नव्हतं. काय करायचं? प्रत्येक वर्गात स्पीकर लावले. समूह गीत स्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला. क्रीडांगण नसताना मुलांना दुसऱ्यांच्या मैदानात नेलं जायचं. तसं करून मुलांनी करून दाखवलं. शाळेची कबड्डीची टीम स्पर्धा जिंकायची. हे सारं करतानाच शाळा शैक्षणिक क्षेत्रातही पुढे गेली. पार्ले टिळकचा दहावीचा निकाल ९७ टक्के तर छत्रपती शिवाजी विद्यालयाचाही तेवढाच. फरक एकच. पार्ले टिळकची निवडून घेतलेली, तर छत्रपती शिवाजी विद्यालयाची मुलं कुठेही वाव नसलेली. पण कामगिरी सारखीच !

मला अनेकांकडून ऐकलेलं. आवडलेलं एक काम. आमच्या शाळेनं पार्ल्यात अनेक झाडे लावली. जोपासलीही. पार्ल्यातील अनेक झाडं पाटील मॅडमच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावली. मॅडमनी दुधाच्या रिकाम्या पिशव्यांमधून घरून पाणी आणून झाडं जोपासायची सवय लावली,

जीवनभराचं देणं आम्हाला छत्रपती शिवाजी विद्यालयातून लाभले, ते पाटीलबाई आणि साळवीसर, जंगले सर, भट सर, चव्हाणबाई अशा शिक्षकांमुळे. शिक्षण संपवून आम्ही पुढे निघालो. १९९७नंतर पाटीलबाईही शाळेतून निघाल्या.

शाळेतून निवृत्त झाल्यावरही माई स्वस्थ नाहीत. नव्हे त्यांना तसं बसणं शक्यच नाही. सध्या त्या कोल्हापुरात एन.डी.पाटील सरांसोबत कृतार्थ जीवन जगत आहेत. मात्र तिथंही स्वस्थ नाहीत. रयत शिक्षण संस्थेच्या किमान ८६ शाळांचा तरी दर्जा अधिक उंचावण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असल्याचं कळत आहे. म्हणजे एक छत्रपती शिवाजी विद्यालय घडवलेल्या आमच्या पाटील मॅडम आता जीवनाच्या या टप्प्यावरही तशाच अनेक शाळा घडवत आहेत आणि माझ्यासारखे लाखो विद्यार्थी !

– तुळशीदास भोईटे

9833794961


Tags: Chhatrapati Shivaji VidyalayaSaroj patilsharad pawarछत्रपती शिवाजी विद्यालय
Previous Post

फ्लाय ॲशच्या व्यावसायिक वापरासाठी सरकारचे प्रयत्न

Next Post

स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!

Next Post
nilesh sambare

स्वकमाईतून समाजसेवा....समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा 'जिजाऊ' वसा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!