सध्या जगभरात कोरोना महामारीचे संकट पहायला मिळत असून त्यासोबतच वेगवेगळ्या साथींचे आजार देखील पसरत आहेत. मोठ्या प्रमाणात आजार पसरण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सतत हवामानात होणारे बदल आणि माणसांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल. नेहमीच्या आहाराव्यतिरिक्त काही खाल्यास काहींना जुलाब किंवा अतिसार होण्याची शक्यता असते. जुलाबासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. मात्र, असे असूनही लोक घरगुती उपायांवर अधिक भर देताना दिसतात. यामध्ये विशेषत: जुलाब झाल्यावर केळे खाण्याचा सल्ला दिला जातो. केळे खाल्ल्यामुळे शरीराला बळकटी येते असे म्हणतात. मात्र जुलाब थांबतात का? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
केळ्याचे गुणकारी चौगुण
केळं हे असे फळ आहे जे कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होते. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आतड्यांसंबंधित आजारांसाठी उपयुक्त ठरते. खरतर जुलाब थांबविण्यासाठी केळं हा पारंपारिक उपाय असल्याचे मानले जाते.
केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. केळं हे तंतुमय फळ आहे. त्यामध्ये ऊर्जा, साखर आणि सोडियमचे मिश्रण असते. याचा उपयोग मोठ्या आतड्यातील मीठ आणि पाणी शोषून घेण्यासाठी होतो. तसेच यामुळे मल स्थिर होते. केळं पचनास हलके असल्यामुळे ते अशक्तपणा आणि डिहायड्रेशन कमी करते.
केळ्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटमुळे कॅलरी मिळतात.याचा उपयोग जुलाबामुळे शरीरात निर्माण झालेला अशक्तपणा दूर करण्यास होतो.
तसेच केळ्यामध्ये १०० ते ११६ कॅलरीज असल्यानेजुलाबामुळे कमी झालेली शरीरातील ऊर्जा पुन्हा निर्माण होण्यास मदत होते.
केळ्याचं सेवन कसे कराल?
केळे आणि थोडेसे दही यांचे एकत्रित सेवन करणे ही पारंपारीक पद्धत असून यामुळे भरपूर फायदा होतो. वारंवार जुलाब होत असल्यास मीठाबरोबर केळ्याचे दोन किॆवा तीन वेळा सेवन करावे. काही वेळेस साधे अन्न खाण्यास देखील त्रास होतो अशावेळी दहीभातासोबत केळ्याचे सेवन करु शकता.
केळी घेताना ती चांगली आहेत की नाही, कच्ची तर नाही ना या सर्व गोष्टींची दक्षता बाळगावी नाही तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.