जागतिक महामारी. देशव्यापी टाळेबंदी. मानवतावादी संकट. नैसर्गिक आपत्ती. हे सर्व काही 8 महिन्यांच्या थोडक्या कालावधीत. मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) या आरोग्यसेवा, शिक्षण, समाज कल्याण आणि जल व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे स्थित स्वयंसेवी संस्थेने, या संकटांच्या काळात कोणतीही व्यक्ती मदतीवाचून वंचित राहू नये, याची काळजी घेऊन देशाला मदत केली.
‘एमएमएफ’ची विविध पथके जलदगतीने कामे करून मदत पुरविण्यात त्यावेळी अग्रेसर होती. पुणे शहरातील आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक रूग्णालयांमध्ये कोरोनाशी झुंजणाऱ्या योद्ध्यांना पीपीई किट, फेस मास्क, उपकरणे व इतर वैद्यकीय वस्तूंचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी त्वरित पावले उचलण्यात आली. साथीच्या काळातील पहिल्या 2 महिन्यांत ‘एमएमएफ’ने रोजंदारीवर काम करणाऱ्या सुमारे 80 हजार जणांना किराणा सामान आणि तयार अन्नपदार्थ पुरविले. पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्रातील अनेक विस्थापित कुटुंबांपर्यंत पोहोचून, ‘मुकुल माधव फाउंडेशन’ने अम्फान चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ आणि आसाममधील पूर यांच्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका व पुनर्वसन या कार्यात सहाय्य केले.
भारताला आपल्या पायावर उभे करून समर्थ बनविण्यासाठी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ने ‘#गिव्हविथडिग्निटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. 24 राज्यांमधील 70,000 हून अधिक कुटुंबांना किराणा सामान आणि स्वच्छतेची आवश्यक किट्स पुरवून या उपक्रमातून सध्याच्या सणासुदीच्या दिवसांत आनंद निर्माण करण्यात येत आहे.
दि. 25 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, अमरावती, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, रत्नागिरी, पालघर, बुलढाणा, परभणी, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, आदी) 20 हजार किट्सचे वाटप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ही 20 हजार किट्स इंडसइंड बँक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी प्रायोजित केली आहेत.
या ‘किट्स’चे लाभार्थी वंचित समाजातील आहेत. स्थानिक जिल्हा प्रशासनाचे सहकार्य घेऊन, स्वयंसेवी संस्था, समविचारी मित्र, फाउंडेशनचे हितचिंतक यांच्या मदतीने या वंचितांची ओळख पटविण्यात आली. ‘किट’मधील बहुतांश सामग्री ही स्वयंसेवी संस्था, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि अन्य बिगरसरकारी संस्थांकडून खरेदी करण्यात आलेली आहे. पूर्ती समूह, माणदेशी फाउंडेशन आणि स्टार फूड्स यांच्याकडून यासाठी अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. सीवायडीए (सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटीज) या संस्थेद्वारे मास्क तयार करण्यात आले आहेत आणि बारामतीमधील सोबती या संस्थेने सॅनिटरी नॅपकिन्स पुरवून आम्हाला मदत दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री स्पोर्ट्स क्लब येथे एका छोट्या सोहळ्यात शनिवारी, 7 नोव्हेंबर 2020 रोजी, या मोहिमेचे उद्घाटन करून तिचा शुभारंभ केला. अॅड. गौरी छाब्रिया, ‘हिंदुजा फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल अब्राहम, ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’चे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, ‘ऑर्बिट’चे संचालक संजय आशर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी या प्रसंगी उपस्थित होते.
रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाजबांधणी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या खात्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल व लहान स्थानिक व्यवसायांना सक्षम बनविण्याचे प्रयत्न करीत असल्याबद्दल ‘फाउंडेशन’चे कौतुक करून आशीर्वाद दिला.
या उपक्रमाला आतापर्यंत मिळालेल्या सहकार्यामुळे तो आपण मोठ्या स्तरावर नेऊ शकू, हा आत्मविश्वास आम्हाला मिळाला आहे. त्याचप्रमाणे संस्थात्मक आणि वैयक्तिक दानशूरांच्या देणग्यांमुळे आम्हाला आणखी अनेक लाभार्थ्यांपर्यत पोहोचता आले आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, केव्हिनकेअर, मॅरीको, हिंदुजा फाउंडेशन, नेस्ले, इंडोरामा, इंडसइंड बँक, अशोक लेलँड, गल्फ ऑइल आणि अन्य कॉर्पोरेट्स या कामी स्वेच्छेने पुढे आले आहेत आणि यंदाच्या दिवाळीत ‘#गिव्हविथडिग्निटी’ला अनुसरून त्यांनी सहाय्य केले आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना ‘मुकुल माधव फाउंडेशन’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “कोरोनाच्या साथीमुळे आपले सामर्थ्य, दृढनिश्चय व खंबीरपणा यांची खरी परीक्षा होत आहे. कितीही आव्हाने आली तरी, आलेल्या प्रसंगाला सामोरे जात समाजाची सेवा करण्यास एमएमएफ कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत असलेल्या असुरक्षित व्यक्तींना मदत करण्यासही आम्ही सतत सज्ज आहोत. नऊ आठवड्यांपूर्वी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात अवतरले आहे आणि दिवाळीच्या काळात ते साकारही होईल. ‘#गिव्हविथडिग्निटी’ ही एक भावना आहे. या भावनेतून स्वयंसेवी संस्था आणि एमएसएमई उद्योगांना बऴ मिळत आहे आणि त्यातूनच, ज्यांनी आपले जीवनमान गमावले आहे, त्यांना किराणा सामान व स्वच्छतेच्या आवश्यक वस्तू पुरविल्यास त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. सहकार्याच्या शक्तीने आमच्याशी हातमिळवणी करण्यासाठी, तसेच दिवाळीच्या काळात आशा आणि आनंद पसरविण्याच्या आमच्या मोहिमेत आम्हाला मदत करण्यासाठी, काही आघाडीचे ब्रॅंड पुढे आले आहेत. आम्ही करीत असलेल्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या व इतरांना मदत करण्याच्या आमच्या कार्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांची मी ऋणी आहे.”
‘कोरोना’ची साथ फार निर्दय आहे. तिने आर्थिक स्थैर्य आणि मानसिक व शारीरिक आरोग्यावर मोठा प्रहार केला आहे. अशा स्थितीत, गंभीरपणे बाधित झालेल्यांना व कोलमडलेल्यांना पुन्हा उभारी देण्यास फाउंडेशन कटिबद्ध आहे.